महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मंगळवार, 28 जानेवारी रोजी सकाळी झालेल्या विमान अपघातात निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज सकाळी 11 वाजता बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
अपघाताचा तपशील
मुंबईहून बारामतीकडे जात असलेले चार्टर विमान सकाळी 8:44 वाजता बारामती विमानतळावर उतरत असताना धावपट्टीजवळ अपघातग्रस्त झाले. खाली कोसळताच विमानाला आग लागली. या भीषण अपघातात विमानातील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला.
या विमानात अजित पवार यांच्यासह कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन शांभवी पाठक, सुरक्षारक्षक विदिप जाधव आणि फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी प्रवास करत होते. या सर्वांचा या अपघातात मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती देण्यात आली आहे.
बारामतीत शोककळा
अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी दिल्लीहून बारामतीत धाव घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार हेही मुंबईहून बारामतीत पोहोचले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बारामतीत जाऊन पवार कुटुंबीयांचे सांत्वन केले.
बारामतीत येत्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचारासाठी अजित पवार यांच्या चार जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले होते. या प्रचारासाठीच ते मुंबईहून बारामतीकडे विमानाने प्रवास करत होते.
राज्यात तीन दिवसांचा दुखवटा
अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. तसेच काल शासकीय सुटी जाहीर करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. सामान्य प्रशासन विभाग (राजशिष्टाचार) विभागामार्फत त्यांच्या पार्थिवावर शासकीय सन्मानासह अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे कळविण्यात आले आहे.
शरद पवार यांची प्रतिक्रिया
शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की,
“अजित पवार यांचा अकाली मृत्यू हा महाराष्ट्रासाठी मोठा धक्का आहे. निर्णयक्षमता आणि कर्तृत्व असलेला नेता महाराष्ट्राने गमावला आहे. या अपघातामागे कोणतेही राजकारण नाही. हा निव्वळ अपघात आहे. या दुःखद घटनेत राजकारण आणू नये.”
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शोक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करताना म्हटले,
“अतिशय अनाकलनीय परिस्थितीत अजितदादा पवार यांचे निधन झाले. महाराष्ट्रासाठी हे कधीही न भरून येणारे नुकसान आहे. ते संघर्षशील, लोकनेते होते. माझा एक दिलदार आणि दमदार मित्र आज आपल्यातून निघून गेला आहे.”
⚠️ Disclaimer:
ही बातमी विविध माध्यमांतून उपलब्ध झालेल्या अधिकृत माहिती आणि निवेदनांवर आधारित आहे. परिस्थितीनुसार तपशीलांमध्ये बदल होऊ शकतात. कोणतीही अफवा पसरवण्याचा उद्देश नाही.





