29.4 C
Pune
Friday, October 30, 2026

पुणे जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचाराला तात्पुरता विराम; राजकीय समीकरणांवर परिणाम

पुणे : पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम सुरू असतानाच, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील दुर्दैवी निधनामुळे गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यातील राजकीय वातावरण शांत झाले आहे. या घटनेनंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप थांबले असून प्रचारालाही तात्पुरता विराम लागल्याचे चित्र आहे.

महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपने पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ता मिळवत जोरदार मुसंडी मारली होती. त्यामुळे आत्मविश्वास वाढलेल्या भाजपने पुणे जिल्हा परिषद निवडणुकीवर विशेष लक्ष केंद्रित केले होते. कोणत्याही परिस्थितीत जिल्हा परिषद ताब्यात ठेवण्याच्या दृष्टीने पक्षाकडून नियोजन करण्यात आले होते. मात्र अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर संपूर्ण जिल्हा स्तब्ध झाला असून प्रचाराची धार काहीशी बोथट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने यावेळी काही जुन्या निवडून आलेल्या सदस्यांची तिकिटे कापून नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. शिवसेनेनेही जुन्नर, आंबेगाव आणि खेड तालुक्यांत संघटनात्मक ताकद वाढवत निवडणूक लढतीला धार देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र सध्या मतदारांची मानसिकता हळवी झाल्याचे दिसून येत आहे.

भोर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरीचे चित्र दिसून आले आहे. माजी सदस्यांची तिकिटे कापल्याने त्यांनी अपक्ष किंवा विरोधी भूमिका घेतली आहे. त्याच ठिकाणी भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनीही बंडखोरी करत निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. राजगड, दौंड आणि पुरंदर तालुक्यांत राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यात थेट लढती होत असून स्थानिक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

शिरूर तालुक्यात माजी आमदारांच्या कुटुंबातील उमेदवारीमुळे राष्ट्रवादीत बंडखोरी झाली आहे. जुन्नर तालुक्यात बोरी-खोडद गटात अपक्ष उमेदवारीमुळे पक्षांतर्गत आव्हान उभे राहिले आहे. आंबेगाव, खेड, दौंड, इंदापूर आणि मुळशी तालुक्यांमध्येही विविध पक्षांतील उमेदवारांमध्ये कुटुंबीयांतील थेट लढती, तसेच बहुकोनी राजकीय संघर्ष पाहायला मिळत आहे.
२०१७ च्या जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांपैकी काहींनी पक्षांतर केल्याने राष्ट्रवादी काँग्रेससमोर अतिरिक्त आव्हाने उभी राहिली आहेत. नगरपरिषद व नगरपंचायतीच्या निवडणुकांतील नाराजीचे पडसाद आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतही दिसत आहेत.
मंगळवारी (ता. २७) उमेदवारी अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवसानंतर लढतींचे चित्र स्पष्ट झाले आहे. जिल्हा परिषदेच्या ७३ गटांसाठी २९९ उमेदवार, तर पंचायत समितीच्या १४६ गणांसाठी ५२८ उमेदवार रिंगणात आहेत. जिल्हा परिषदेचे ३०० आणि पंचायत समितीचे ५५४ उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले आहेत.
अजित पवार यांच्या निधनामुळे निर्माण झालेल्या वातावरणाचा निवडणूक प्रचार आणि मतदारांच्या निर्णयप्रक्रियेवर नेमका काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

⚠️ Disclaimer:

वरील बातमी देण्यात आलेली माहिती ही उपलब्ध मसुदा व सार्वजनिक राजकीय घडामोडींवर आधारित आहे. कोणत्याही राजकीय पक्षाच्या समर्थन किंवा विरोधाचा उद्देश नाही. बातमी केवळ माहितीपर स्वरूपात सादर करण्यात आली आहे.

About The Author

Recent Articles

spot_img

Related Stories

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay on op - Ge the daily news in your inbox

error: Content is protected !!